मुंबई - मुलींना खेळात प्रगती साधता यावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि कबड्डी खेळाचा प्रसार व्हावा, यासाठी नववर्षाचे औचित्य साधत प्रभादेवीत 'प्रभा भवानी' या मुलींच्या कबड्डी संघाची निर्मिती करण्यात आली.
महाराष्ट्राची शान असणारा कबड्डी हा खेळ सर्वांपर्यंत पोहचावा, महिलांना संधी मिळावी, यासाठी उद्योजक किसन सारंग यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदानात 'प्रभा भवानी' या महिला संघाची स्थापना करण्यात आली.
हेही वाचा - डिसेंबरमध्ये मुद्रांक शुल्क वसुलीतून राज्याच्या तिजोरीत 2464 कोटी
मुलींच्या संघाचे अनावरण गरिमा फाउंडेशनच्या संस्थापिका नेत्रा सोरप व जाफर फाऊंडेशनचे सदस्य दीपक सोरप यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह रवींद्र देसाई प्रभा भवानी संघाचे अध्यक्ष किसन सारंग, प्रदीप देढीया, राजेश घाग उपस्थित होते.
भविष्यात या खेळाला नवसंजीवनी मिळावी, युवा पिढी या खेळांकडे वळावी आणि भारतीय संघाला यातून चांगल्या महिला खेळाडू मिळाव्यात, यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे. दादर, प्रभादेवी, माहीम, वरळी या भागांमध्ये अनेक कबड्डी संघ आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे हरियाणा, तामिळनाडू येथे मैदानी खेळांना प्रोत्साहन दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील खेळाडू घडविण्याची गरज आहे, असे किसन सारंग यांनी सांगितले.
हेही वाचा - चारचाकी पार्किंग करवसुलीतून आर्थिक जोडणीचा नगरसेवक जयस्वाल यांचा मनपासमोर प्रस्ताव