मुंबई - कर्णबधिरांच्या मोर्चावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी म्हटले आहे. विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर विद्यार्थ्यांवर पुणे येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे. विद्यार्थ्यांच्या निदर्शनात ७ ते ८ पोलीस जखमी झाल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे.
बापट म्हणाले, या संबंधीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे. यावर योग्य ती कारवाई होईल. पोलिसांनी अशा घटकांसोबत अधिक सौजन्यपूर्ण वागायला हवे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे हे यासंदर्भात आढावा घेत आहेत. आज कर्णबधिरांच्या मागण्यासंदर्भात शिष्ठमंडळ त्यांची भेटणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.
लाठीचार्ज कोणत्या कारणामुळे करण्यात आला, यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.