जालना - मुंबई, पुणे येथील कोविड-19 रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूटमार होत आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे येथील रुग्णालयांमध्ये आता 'जिप्सा' लागू करण्यात आला आहे. या निर्णयानुसार या शहरात जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन या संस्थेकडून ठरवून दिलेले दर रुग्णालयांना आकारावे लागतील. वेगवेगळ्या आजारांसाठी जिप्साकडून दर निश्चित केले आहेत. तेच दर रुग्णालयांना आकारता येणार आहेत.
सध्या पुणे, मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहे. या परिस्थिती या शहरांमधील रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचे दिसत आहेत. अशा लुटमारीला 'जिप्सा'मुळे आळा बसेल. तसेच ग्रीन झोन, ऑरेंज झोनमधील व्यवसाय सुरू करण्यासाठी कामगारांना पास देता येतील का ? याचाही विचार प्रशासन करत आहे, अशी माहिती जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा... 'हृदयातील माणसाला कोणीही डावलू शकत नाही, अशी प्रतिमा आज उद्धव ठाकरेंची आहे'
राज्यातील टाळेबंदी 3 मे रोजी बंद करण्याबाबत राजेश टोपे यांनी सांगितले की, 'केंद्र सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे आल्यानंतर केंद्राची तत्वे आणि राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वे या दोन्हीची सांगड घालून सामान्य आरोग्य प्रशासन योग्य ते निर्णय घेईल. तसेच सध्या असलेली आर्थिक परिस्थिती देखील विचारात घ्यावी लागणार आहे' असे ते म्हणाले.
सध्या रेड झोन आणि ऑरेंज झोनमधील व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासन विचार करत आहे. या ठिकाणी कंपनीमध्ये जाण्यासाठी कामगारांना पास देण्याचाही प्रयत्न असल्याचे टोपे यांनी सांगितले. केंद्र सरकारने आपापल्या राज्यातील लोकांना बोलावून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आपल्या राज्याचे परराज्यात असलेल्या आणि बाहेरच्या राज्यातील आपल्या येते असलेले नागरिक, कोठे आहेत, त्यांची संख्या, त्यांना ने-आण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा. याचा देखील विचार देखील सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.