मुंबई - मोस्ट वॉन्टेड गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारमधील पाटणातून अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार म्हणून ओळखला जातो.
काही दिवसांपूर्वी एजाज याची मुलगी शिफा शेख उर्फ सोनिया लकडावाला हिला मुंबईतील एका बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिच्या पोलीस चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलीस एजाजपर्यंत पोहचले.
हेही वाचा - निर्भया प्रकरण: दोषी विनय कुमारने दाखल केली 'क्युरेटीव्ह पिटीशन'
सुरूवातीला एजाज दाऊद इब्राहिमसह काम करत होता. 1992 मध्ये छोटा राजन दाऊद इब्राहिमपासून वेगळा झाला. त्यानंतर एजाज लकडावाला छोटा राजनसह काम करू लागला. 1992 ते 2008 या दरम्यान एजाज लकडावाला याने मुंबईतील विविध व्यावसायिकांना खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या. खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसाठी धमकावणे यासारखे गंभीर 27 गुन्हे एजाज लकडावालाच्या नावावर दाखल आहेत. त्याच्या विरोधात 80 तक्रार अर्ज सुद्धा दाखल झालेले आहेत.
2008 मध्ये बँकॉक येथे असताना एजाजवर छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळीबार केला होता. यामध्ये एजाज लकडावाला सात गोळ्या लागूनही वाचला होता. छोटा राजनबरोबर आर्थिक मतभेद झाल्यानंतर त्याने स्वतःची टोळी बनवली होती. लकडावाला याचे वास्तव्य अमेरिका, इंडोनेशिया, बँकॉक, मलेशिया या देशांत होते. यादरम्यान त्याने या देशांमध्ये स्वतःची करोडो रुपयांची संपत्ती जमवली आहे.