मुंबई : महाराष्ट्रात संपाद्वारे कामगारांची बाजू प्रखरपणे मांडणारे, आणि ज्यांचे नाव ऐकताच कारखान्याच्या मालकांनाही घाम फुटे, असे कॉम्रेड दत्ता सामंत यांचा 1997 मध्ये खून झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यावर त्यांच्या खुनाचा आरोप होता. या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज पुराव्याअभावी छोटा राजनला निर्दोष मुक्त केले आहे.
सामंत यांच्यावर 17 गोळ्या झाडल्या : 16 जानेवारी 1997 रोजी डॉक्टर दत्ता सामंत पवईहून घाटकोपरच्या दिशेने जात होते. पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, चार अज्ञात आरोपी बाईकवर आले आणि त्यांनी दत्ता सामंत यांची गाडी रोखली. ते त्यांच्यावर जवळपास 17 गोळ्या फायर करून निघून गेले. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. कनिष्ठ न्यायालयापासून सीबीआय न्यायालयापर्यंत हा खटला चालला.
पुराव्या अभावी मुक्तता : कॉम्रेड दत्ता सामंत यांचा खटला सीबीआयचा विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी अनेक तथ्य व पुरावे तपासण्याचे काम सीबीआयच्या विशेष न्यायालयाने केले. परंतु छोटा राजन याने कॉम्रेड दत्ता सामंत यांचा खून केला, या आरोपाला पुष्टी देणारा सबळ पुरावा न्यायालयासमोर आला नाही. त्यामुळे अखेर पुराव्या अभावी न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला आहे.
'मारेकऱ्यांना राजकीय शक्तींचे पाठबळ होते' : या संदर्भात सर्व श्रमिक कामगार संघटनेचे नेते कॉम्रेड उदय भट यांनी सांगितले की, 'त्यावेळी कारखान्याचे मालक कामगारांची पिळवणूक करत होते. मात्र दत्ता सामंत यांनी लाखो कामगारांच्या हिताची भूमिका घेतली होती. त्यामुळेच अनेकांना ते अडचणीचे वाटत होते. म्हणून त्यांची सुपारी दिली गेली. दत्ता सामंत यांच्या मारेकऱ्यांना राजकीय शक्तींचे पाठबळ होते. त्यांचा खून केला गेला, मात्र त्यांचे खरे मारेकरी सापडले नाही', अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा :