मुंबई- येथील साकिनाका परिसरात एका 20 वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच फरार 5 आरोपीपैकी आशिष प्रकाश साळवी, दिनेश दीपक माने, अजीज शफीक खान या आरोपींना साकिनाका पोलिसांनी अटक केली. आरोपीला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले असता, कोर्टाने आरोपींना 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
साकीनाका पोलीस ठाण्यात मंगळवारी एका 21 वर्षे तरुणीने आपली 20 वर्षीय बहिण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारदार महिला ही चांदिवली संघर्षनगर परिसरात आपल्या 20 व 23 वर्षाच्या दोन बहिणी सोबत राहते. तक्रारदार तरुणीच्या दोन्ही बहिणी मनोरुग्ण असल्याने त्यांना आई-वडील घरातून एकटे बाहेर सोडत नाहीत. पण मंगळवारी दुपारी वीस वर्षाची बहीण घरातील सर्व सदस्य विश्रांती घेत असताना अचानक घराच्या बाहेर गेली. यावेळी आपली बहीण घरात दिसत नसल्याने तिची परिसरामध्ये शोधाशोध करण्यात आली. मात्र, ती परिसरात कुठेही सापडली नाही.
साकीनाका पोलीस ठाण्यात सायंकाळी याप्रकरणी तक्रार दिली. या दरम्यान रात्री साडेदहा वाजता या पीडित तरुणीला घेऊन एक तरुण परिसरात आला. ती परिसरातच एका शाळेजवळ फिरत होती. तिला विचारपूस केल्यानंतर तिला बबन नावाच्या एका तरुणाने घरातून खाली इशारा केला त्यामुळे ती घराच्या खाली गेल्याचे पिडीतेने सांगितले. परिसरातील पवार शाळेजवळील एका निर्जन ठिकाणी आरोपी बबन पीडीत तरुणीला घेऊन गेला व त्याने प्रसाद पवार, मोहम्मद खान, दिनेश माने, प्रथमेश गांधी यांना बोलावले आणि तिच्यावर आळीपाळीने सर्वांनी बलात्कार केला. तिला जिवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कोणालाही सांगू नको, सांगितले तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली. त्यानंतर तिला त्याच परिसरात आणून सोडले.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले. मात्र अशिष साळवी ,दिनेश माने आणि मोहम्मद खान या तिघांना पोलिसांनी बुधवारी परिसरातून अटक केली. पोलीस उर्वरीत दोघांचा शोध घेत आहेत. पोलीस तपासात तक्रारदार तरुणी पाचही आरोपींना ओळखत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रसाद व बबन पीडित मुलीच्या इमारतीत राहतात. तर इतर आरोपी बाजूच्या इमारतीत राहतात. पीडित मुलीसह तिन्ही अटक आरोपींची लवकरच मेडिकल तपासणी होणार असल्याचे पोलिसानी सांगितले आहे. अधिक तपास साकीनाका पोलीस करीत आहेत.