नवी मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र,काही व्यक्ती परिस्थितीचे गांभीर्य न जाणता या इंजेक्शनचा काळाबाजार करत आहे. त्यामुळे कित्येक गरजू लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबई शहरात या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, तिघांना कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे.
वीस हजार रुपयाला विकले जात होते रेमडेसिवीर इंजेक्शन
कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदर यांना मिळालेल्या माहितीनुसार ही व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन प्रत्येकी 20 हजार रुपयांना विकत असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली. सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
असा रचला सापळा
23 तारखेला कोपरखैरणे पोलिसांच्या माध्यमातून प्रदीप हंगे व प्रसाद घोरपडे यांना खोटे ग्राहक म्हणून पाठविण्यात आले. यावेळी सापळा रचून समीर चांदोरकर या डोंबिवली येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोपरखैरणे सेक्टर 15 येथे कोपरखैरणे पोलिसांनी अटक केले व त्याला चार रेमडेसिवीर इंजेक्शन विकत असताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून 4 रेमडेसिवीर इंजेक्शन एक ऍक्टिवा मोटरसायकल 1 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 68 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर चांदोरकर याच्यासह त्याच्याबरोबर गुन्ह्यात सहभागी असणारे वंदना उमेश जाधव व विक्रम विनोद पाटील यांनाही अटक करण्यात आली असून, सध्या हे तीनही आरोपी पोलीस कोठडीत असल्याची माहिती तपासाधिकारी निलेश धुमाळ यांनी दिली आहे.