मुंबई : Ganesh Visarjan : आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होत आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी विशेष तयारी केलीये. विसर्जनासाठी मुंबई पालिकेचे १० हजार कर्मचारी तैनात असणार आहेत. तर गणपती विसर्जनासाठी १९८ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलीये.
१९८ कृत्रिम तलावांची व्यवस्था : १९ सप्टेंबरला मुंबईसह संपूर्ण राज्यात गणेशोत्सव सुरू झाला होता. सुरुवातीला दीड दिवसांचे, मग पाच दिवसाचे व सात दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर आता दहा दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. 28 सप्टेंबरला गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईसर राज्यभरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गणरायाच्या विसर्जनासाठी मुंबई सज्ज : 'विघ्नहर्ता' गणपती बाप्पाला निरोप देताना त्याचं विसर्जन सुलभ निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मुंबई महानगरपालिकेचे १० हजार कर्मचारी अनेक सोयी-सुविधांसह सज्ज असणार आहेत. ६९ नैसर्गिक स्थळांसह एकंदरीत १९८ कृत्रिम तलावांची व्यवस्था ही मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त त्याचप्रमाणे गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिलीये.
किनाऱ्यावर ४६८ स्टील प्लेट : गणपती विसर्जनासाठी मुंबईतील विविध चौपाटींवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ७६४ जीवरक्षकांसह ४८ मोटर बोटी तैण्यात ठेवण्यात आल्या आहेत. गणपती बाप्पाच्या भव्य दिव्य मूर्ती घेऊन विसर्जनासाठी येणारी वाहनं चौपाटीवरील वाळूमध्ये अडकू नयेत यासाठी किनाऱ्यावर ४६८ स्टील प्लेट व छोट्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी विविध ठिकाणी ४६ जर्मन तराफ्यांचीही व्यवस्थासुद्धा करण्यात आलीये. त्याचप्रमाणं प्रशासकीय विभाग स्तरावर एकूण १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून, ६० निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. भक्तांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी ६८ स्वागत कक्ष तयार करण्यात आले असून, १२१ फिरती प्रसाधनगृहेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
७५ प्रथमोपचार केंद्र : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गणेश भक्तांसाठी ७५ प्रथमोपचार केंद्रासह ६१ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं खांबांवर व उंच जागी एकंदरीत १०८३ फ्लड लाईट आणि २७ सर्च लाईट लावण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान भक्तांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये याकरिता मुंबई महानगरपालिकेनं सर्व स्तरावर विविध सुविधा केल्या आहेत.
विसर्जनाच्या दिवशी भरती ओहोटीची काळजी घ्या : २८ सप्टेंबरला विसर्जनाच्या दिवशी समुद्रात सकाळी ११ वाजता भरती असून, ४.५६ मीटर उंचीच्या लाटा त्याचप्रमाणे रात्री ११.२४ वाजता भरती असून, ४.४८ मीटर उंच लाटा उसळू शकतात. तसेच सायंकाळी ५.०८ वाजता ओहोटी आहे. दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबरला पहाटे ५.१५ वाजता ओहोटी आहे. तसेच सकाळी ११.३७ वाजता भरती असून, ४.७१ मीटरच्या लाटा उसळू शकतात. भरती ओहोटी दरम्यान गणेश भक्तांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई महानगरपालिका तसेच मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय.
हेही वाचा -
- Ganesh festival In Africa : सातासमुद्रापार बाप्पाचा जयजयकार! आफ्रिका खंडातील 'या' देशात मराठी लोकांकडून गणेशाची स्थापना
- Mumbai Ganesh Dekhava : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव कुठल्या दिशेला जातोय? पाहा अप्रतिम गणेश देखावा
- Ganeshotsav 2023: परळचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग, पाहा व्हिडिओ