मुंबई - माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्याबरोबर नवी मुंबई पालिकेतील 48 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा - राधाकृष्ण विखे-पाटीलांसह 3 मंत्र्यांच्या मंत्रिपदासंदर्भातील शुक्रवारपर्यंत सुनावणी तहकूब
नाईक यांना केंद्रीय मंत्री किंवा पक्षाचे नेते यांच्या उपस्थितीत करायचा होता. मात्र, त्यांच्या तारखा जुळून न आल्याने नाईक यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यक्षेत्रात भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांच्या कामाचे कौतुक करत भाजपमध्ये त्यांचे स्वागत केले. गणेश नाईक यांच्या भाजपमध्ये येण्याने नवी मुंबईतील भाजप पक्ष आणखी मजबूत झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे. यात सामील होणाऱ्या सर्वांचे स्वागत करुन पक्षाचा विस्तार करणे, आनंदाची गोष्ट आहे. नाईक यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक नगरसेवक आणि महापौर यांच्या येण्यामुळे हा परिवार आणखी विस्तारित झाला आहे. लोक सत्तेसाठी नाही तर मोदींच्या नेतृत्वाखाली जनहिताच्या भावनेने भाजपात येत आहेत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा - मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी जय्यत, बंदोबस्तासाठी ४० हजाराहून अधिक पोलीस तैनात
गणेश नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकमेव महापालिकेवरही कमळ फुलणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी सकाळी कोकण आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वतंत्र गटाची नोंदणी केली. प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाईक समर्थकांनी शहरात मोठमोठे बॅनर लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींच्या सोबत फलक व बॅनरवर गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक व माजी महापौर सागर नाईक यांची फोटो झळकत आहेत.