मुंबई - मागील अनेक महिन्यांपासून मुंबईकर ज्या कोरोना प्रतिबंधक लसीची वाट बघत होते, ती लस आता काही दिवसांत मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मुंबईकरांचे लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईत 8 मोठी केंद्रे लसीकरणासाठी सज्ज आहेत. पण, पुढे लसीकरणाची व्याप्ती वाढत जाणार असल्याने ही केंद्रे अपुरी पडण्याची शक्यता लक्षात घेत आता मुंबईतील सर्व कोविड सेंटरवरही लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यानुसार आता नेस्को, बिकेसीसह सर्व कोविड सेंटरवर तयारीची लगबग सुरू झाली असून एका आठवड्यात केंद्राची उभारणी पूर्ण करण्याचे लक्ष कोविड सेंटरचे आहे. तर मंगळवारपासून (दि. 4 जाने.) कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.
लसीकरण केंद्राचा अतिरिक्त आयुक्तांकडून आढावा
लसीच्या चाचण्या देशभरात सुरू झाल्याबरोबर दुसऱ्या बाजूला पालिकेने लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारीला जोरात सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून आता कोणत्याही क्षणी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. लस आल्याबरोबर 24 तासात लस देण्यास सुरुवात करण्यासाठी पालिका सज्ज असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे. ही तयारी इतकी योग्य आहे की मुंबईला लसीकरण मोहिमेसाठी कुठल्याही ड्राय रनची ही गरज नाही, असा ही पालिकेचा दावा आहे. दरम्यान, पालिकेने मुंबईत 8 लसीकरण केंद्रे उभारली आहेत. या केंद्राची पाहणी शनिवारी (दि. 2 जाने.) पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केली. यावेळी त्यांनी कोविड सेंटरला ही लसीकरण मोहिमेत सामावून घेणार असल्याचे जाहीर केले.
म्हणून कोविड सेंटरचाही मोहिमेत समावेश
मुंबईत पहिल्या टप्प्यात अंदाजे दीड लाख कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. तर त्यानंतर सुमारे 5 लाख फ्रंटलाइन कोरोना वॉरिअर्सना लस टोचवली जाणार आहे. हे सर्व आकडे मोठे असून 8 केंद्र अपुरी पडण्याची शक्यता आहे. तसेच लसीकरणाला वेग देण्यासाठी दिवसाला काही निश्चित टार्गेट पालिकेने ठेवले आहे. हे टार्गेट पूर्ण करत लसीकरण योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी कोविड सेंटरमध्ये ही लसीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सध्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचा भार खूपच कमी आहे. अशावेळी या सेंटरचा वापर करणे सोयीचे होणार असल्याचेही पालिकेचे म्हणणे आहे.
नेस्कोत 10 तर बिकेसीत 15 युनिटस
कोविड सेंटरमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याचे आदेश आल्याबरोबर सेंटरचे अधिष्ठाता आणि कर्मचारी वर्ग कामाला लागला आहे. अगदी जागा निश्चित करण्यापासून ते प्रशिक्षणाच्या तयारी आता वेग आला आहे. त्यानुसार गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्ये 10 युनिट उभारले जाणार आहेत. यात कोल्ड रूम (लस साठवणूक), लस टोचवण्यासाठीची रूम आणि एक रुग्ण देखरेख रूम असे हे युनिट असणार आहे. आजपासूनच हे युनिट तयार करण्यास आम्ही सुरुवात केली असून आठवड्याभरात काम पूर्ण होईल, अशी माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी दिली आहे. तर बिकेसी असे 15 युनिट उभारण्यात येणार असून ही उभारणी नेमकी कशी असेल याची माहिती मंगळवारी (दि. 5 जाने.) प्रशिक्षणादरम्यान मिळेल. त्यानुसार आम्ही लवकरात लवकर केंद्र तयार करू आणि लसीकरण मोहिमेचा भाग होऊ. ही मोहीम ही यशस्वी करू, असा विश्वास बिकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का? - सोमैया
हेही वाचा - "ही तर टाटा, बिर्लाची सेना"; आशिष शेलारांची मुंबई महापालिका व शिवसेनेवर टीका