मुंबई - पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे) आज निकाल देणार आहे. या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली असून निकाल भारताच्या बाजूने लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुलभूषण यांच्या मित्रांनी त्यांच्या सुटकेसाठी पूजादेखील करत देवाकडे पार्थना केली आहे. तसेच देशभरातही कुलभूषण यांच्या सुटकेसाठी ठिकठिकाणी होमहवन करत प्रार्थना केली जात आहे.
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादाच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने 2017 मध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती.