मुंबई - भाजप मित्रपक्षांच्या पदरात लोकसभेची जागा पडणार नसून बारामतीतही कमळ चिन्हावरच निवडणूक लढवली जाणार, असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'मीडिया रुम'चे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते.
भाजपमध्ये कुणाचीही नाराजी नाही, गेल्या निवडणुकीत युतीने ४२ जागा निवडून आणल्या होत्या, या निवडणुकीत त्यापेक्षा मोठी लाट असून विक्रमी जागा निवडून आणणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. त्याचवेळी मित्र पक्षांना लोकसभेसाठी जागा मिळणार नाहीत, तर आगामी विधानसभेच्या निवडणुकात त्यांना सामावून घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी दिले.
शिवसेना-भाजप युतीमधील जागांची अदलाबदलही होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. येत्या दोन दिवसात भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. युतीतल्या नेत्यांमध्येही कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यामुळे भाजपसाठी अतिशय अनुकूल वातावरण असून विक्रमी यश मिळेल असेही त्यांनी सांगितले.