मुंबई - राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नि:शुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ८० लाख रुग्णांच्या सुमारे १०० प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत. राज्यातील २ हजार ३१५ आरोग्य संस्थांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिली आहे.
विविध आजारांच्या निदानासाठी रक्त, मुत्र, थूंकी तपासणे आदी प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्याची आवश्यकता असते. या चाचण्या करण्यासाठी खर्चही जास्त येतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या चाचण्यांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावे लागू नये, यासाठी मागील वर्षी राज्य शासनाने एच.एल.एल. लाईफ केअर संस्थेसोबत करार केला होता. या करारअंतर्गत राज्यातील २ हजार ३१५ आरोग्य संस्थांमध्ये विविध आरोग्य निदान चाचण्या मोफत केल्या जात आहेत.
या प्रकल्पानुसार करार केलेल्या संस्थेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर २५ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जातात. ग्रामीण रुग्णालय,उप जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी ३२, उपजिल्हा रुग्णालय (१०० खाटांपेक्षा अधिक), महिला रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि विभागीय संदर्भ रुग्णालयात ४६ प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्ताशी संबंधीत विविध चाचण्या (हिमॅटोलॉजी), थॉयराईड, मलेरिया, मायक्रोबायोलॉजी आदी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. त्यासाठी येणारा खर्च शासनामार्फत दिला जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आतापर्यंतविविध प्रकारच्या सुमारे १ कोटी ८२ लाख ५२ हजार चाचण्या मोफत करण्यात आले आहे
या उपक्रमांतर्गत १ हजार ८१८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४२३ ग्रामीण रुग्णालय आणि ७४ जिल्हा रुग्णालय असे एकूण २ हजार ३१५ आरोग्य संस्थांमध्ये मोफत प्रयोगशाळा चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत ३५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८० लाख रुग्णांच्या नि:शुल्क चाचण्या करण्यात आल्या असून सुमारे १ कोटी ८२ लाख ५२ हजार विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
आरोग्य संस्थांच्या स्तरावर संकलीत केलेले नमुन्यांचे अहवाल संबंधित आरोग्य संस्थेच्या ई-मेल आयडीवर उपलब्ध करुन दिले जातात. तसेच, चाचणी अहवालच्या प्रती संबंधित आरोग्य संस्थेच्या अधिकाऱ्याकडे दिल्या जातात. या उपक्रमामुळे सामान्यांना शासकीय आरोग्य संस्थेमध्येच प्रयोगशाळा चाचणीची सोय उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे त्याचा वेळ आणि खर्चात बचत होत असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.