मुंबई : म्हाडाच्या व्हीआयपी कोट्यातील फ्लॅटच्या आमिषाने एका शिक्षकासह दोघांची सव्वासात लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी बोगस दस्तावेजाच्या आधारे पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकणी गुन्हा नोंदविला आहे. जितेंद्र नरेंद्र दमानिया आणि शरयू कुणकेरकर या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी : ५२ वर्षांचे तक्रारदार हे शिक्षक असून ते गोरेगाव परिसरात राहतात. ते सध्या एका विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतात. २०१७ साली ते नव्या फ्लॅटच्या शोधात असताना त्यांची नरेंद्र तावडेशी ओळख झाली होती. त्याने त्यांना गोरेगाव येथील सिद्धार्थनगरात म्हाडाचे काही फ्लॅट असून त्यातील काही फ्लॅट व्हीआयपी कोट्यातील आहेत. त्यापैकी एक फ्लॅट त्यांना जितेंद्र दमानिया हा मिळवून देईल असे सांगितले. त्याचा मित्र शरयू हा मंत्रालयातील कर्मचारी असून या दोघांची म्हाडाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चांगले संबंध आहेत. फ्लॅटची फाईल पास करण्यासाठी त्यांच्याकडून मदत मिळेल. त्यानंतर त्यांना म्हाडा फ्लॅटसाठी विविध बँकेतून गृहकर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या दोघांची भेट झाल्यानंतर त्यांनी म्हाडा व्हीआयपी कोट्यातील फ्लॅट ४० लाख रुपयांचे आहेत, असे सांगितले. फ्लॅटसाठी त्यांच्यासह त्यांच्या मित्रांनी या दोघांनाही सुमारे सव्वासात लाख रुपये ऍडव्हान्स दिले होते. त्यानंतर त्यांना फ्लॅटचे बोगस प्रतिज्ञापत्र, म्हाडाकडे पैसे भरल्याची पावती, मानसी फायनानसकडे गृहकर्जासाठी भरलेल्या रक्कमेची पावती, म्हाडाच्या लेटरहेडवर रजिस्ट्रेशनच्या तारखेचे पत्र आदी बोगस कागदपत्रे दिले होते.
गेल्या सहा वर्षांपासून फ्लॅटसाठी मिटींग : गेल्या सहा वर्षांपासून त्यांची म्हाडाच्या फ्लॅटसाठी मिटींग होत होती. मात्र, फ्लॅटबाबतची पुढील कारवाई होत नव्हती. त्यामुळे या दोघांनी त्यांच्याकडे फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत मागण्यासाठी तगाता लावला होता. मात्र, त्यांनी पैसे परत केले नाही. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोरेगाव पोलीस ठाणे गाठले. गोरेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केली. त्याचप्रमाणे म्हाडासह मानसी फायनान्सचे दिलेले बोगस कागदपत्रे पोलिसांना सादर केले होते. या कागदपत्रांसह तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र दमानिया आणि शरयू कुणकेरकर या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्याचा गोरेगाव पोलीस तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : Mumbai Crime : धक्का लागून मोबाईल पडला, रिपेअरिंगच्या पैशावरून झालेल्या भांडणाचे हत्येत पर्यावसन