मुंबई - कोरोना लॉकडाऊन काळात नोकऱ्या गेल्याने लाखो तरुण सध्या रोजगाराच्या शोधात आहेत. याचाच फायदा घेत 'भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्र'च्या नावाखाली देशभरातील लाखो तरुणांना कोट्यवधींचा चुना लावला जात असल्याचा प्रकार ई टीव्ही भारतने समोर आणला आहे. कशा प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लूट केली जात आहे, याबाबत ईटीव्ही भारतचा हा एक्सक्लुजिव रिपोर्ट...
लॉकडाऊन काळात सोशल माध्यमांवर नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघाल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप सारख्या सोशल माध्यमांवर railwaydepartment@gmail.com हा ईमेल आयडी व्हायरल झाला आहे. भारतीय रेल्वे सेवा केंद्रात देशभरात हजारो पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या संदर्भात नमूद केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारांना त्यांची सर्व माहिती भरण्यास सांगितले जात आहे. मुंबईत अशाच एका व्यक्तीने या संकेतस्थळावर जाऊन तिच्याबद्दलचा सर्व तपशील दिल्यावर काही दिवसांनी या उमेदवाराला स्पीड पोस्टच्या माध्यमाने नियुक्ती पत्र पाठवण्यात आले होते. त्यात सदरच्या उमेदवाराची ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याचे कळवण्यात आले.
या नंतर सदरच्या व्यक्तीला एक फोन आला. त्या फोन कॉलदरम्यान पीडित व्यक्तीस करण्यात आलेल्या नियुक्तीसाठी डिपॉजिट रक्कम म्हणून २० हजार ५०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. फोन कॉल आल्यापासून ४८ तासांच्या आत सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अकाऊंट नंबर - ३७२८५६५३३९, आयएफसी कोड - CBIN0283523 या दिलेल्या सरकारी बँक अकाऊंटमध्ये २० हजार ५०० रुपये न भरल्यास करण्यात आणलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल, असेही सांगण्यात आले .
काय लिहिले आहे नियुक्ती पत्रात -
या नियुक्ती पत्रात संबंधित अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कुठल्याही लेखी परीक्षा किंवा मुलीखतीशिवाय ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी दर माहिना ३२ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येणार असून यात वार्षिक ५ टक्के वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. देण्यात येणारे वेतन हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेच्या अंतर्गत असल्याचेही सांगण्यात आले आहे. ही नोकरी २०५०पर्यंत असणार असून यानंतर पेन्शन व निवृत्तीनंतरचे लाभ मिळणार असल्याचे प्रलोभन उमेदवारांना देण्यात आले आहे. एवढेच नाही तर अपंग उमेदवारांना डिपॉजिट रक्कममध्ये सूट देत १२ हजार ५०० रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे.
पैसे भरल्यानंतर पुढच्या २४ तासात रेल्वेचा एक प्रतिनिधी या उमेदवाराच्या घरी येऊन त्यांना लॅपटॉप, मोबाईल फोन दोन साक्षीदारांच्या समोर देईल, असेही नमूद करण्यात आले आहे. पैसे भरल्यानंतर भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्राच्या माध्यमातून उमेदवाराच्या घरापासून जवळ असलेल्या प्रशिक्षण केंद्रांचा पत्ता दिला जाईल. जर एखादा व्यक्ती प्रशिक्षण केंद्रांपासून ६० किलोमीटरच्या अंतरावर राहत असल्यास त्याला मोफत राहण्याची, जेवणाची व वाहनाची सोय करून देण्यात येईल, असे आमिष दाखवण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान जर एखादी व्यक्ती अपात्र होत असेल तर त्याची डिपॉजिटची रक्कम १५ दिवसात पुन्हा बँकेत जमा केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
ईटीव्ही भारतने कशी केली शहानिशा -
स्पीड पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रावर असलेले स्टॅम्प, रेल्वे सचिवांची सही, भारतीय रेल्वेचा शिक्का बनावट असल्याचे आढळून आले. भारतीय रेल्वे भवन सेवा केंद्र नावाची कुठलीही संस्था अस्तित्वात नसून याचा दिलेला पत्ता ए-44 , सेक्टर-67, यमुना एक्सप्रेस रोड, नोएडा 01305 हाही बनावट असल्याचे आढळून आले आहे. ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांना ही कागदपत्रे दाखवून या गोष्टीची शहानिशा केली असता भारतीय रेल्वे सेवा केंद्र नावाची कुठलीही सरकारी संस्था नसून रेल्वेत नोकर भरती ही केवळ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातूनच होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नियुक्ती पत्रावर नमूद करण्यात आलेल्या ०९३१९६८८२८९ या क्रमांकावर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी नोकरी देणाऱया व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता या व्यक्तीने सुरवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. मात्र, आपण पत्रकार असल्याचे सांगितल्यावर या भामट्याने 'तुम्हाला जे वाटेल ते करा' असे म्हणत फोन ठेवून दिला. या सर्व प्रकारामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या देश भरातील लाखो तरुणांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले. याबाबत नागरिकांनी सावध व्हावे, अशा प्रकारच्या सोशल माध्यमांवरील प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन ईटीव्ही भारतकडून करण्यात येत आहे.