मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बहुतांश रोख व्यवहार थांबलेले आहेत. मात्र, डिजिटल व्यवहार वाढत असून या डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक होण्याची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मद्यप्रेमींना ऑनलाईन लुटल्याच्या अनेक घटना घडत आहेत.
मुंबई शहरात सध्या दारू विक्रीचा परवाना असणारी 1 हजार 190 वाईन शॉप आहेत. यातील केवळ 424 वाईन शॉपला घरपोहच मद्यविक्री करण्याची परवानगी आहे. मुंबई शहरात संचारबंदी कायम असल्याने मद्याच्या दुकानाबाहेर तळीरामांना उभे राहून मद्य घेता येत नाही. व्हॉट्सअॅपवरून टोकन देऊन घरपोच मद्य पुरवठा करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी केला जात आहे. याचाच फायदा घेत काही गुन्हेगारांनी दुकानदारांचे व्हॉट्सअॅप क्रमांक आणि दुकानांची छायाचित्र सोशल मीडियावर पोस्टकरून ग्राहकांकडून गुगल पे ,पेटीएमवर आगाऊ रक्कम घेण्याचा तडाखा सुरू केला आहे.
फोर्ट मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पटेल हे स्वतः अनेक वर्षांपासून मद्य विक्रीच्या व्यवसायात आहेत. फेसबुक व अन्य समाज माध्यमांवर ऑनलाईन मद्य पुरवठा करणाऱ्याची लालूच दाखवून दररोज शेकडो लोकांना लुबाडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांमध्ये नागरिकही बदनामीच्या भीतीपोटी पोलिसात तक्रार करत नाही त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. मात्र, आपण स्वतः या संदर्भात उत्पादन शुल्क व पोलीस विभागाकडे तक्रार केली असल्याचे अशोक पटेल यांनी सांगितले.