नवी मुंबई - पनवेल परिसरातील ग्रामीण भागातही कोरोनाचे लोण पसरले आहे. आज पनवेल परिसरातील उलव्यात चक्क 4 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्याने ग्रामीण भागातही भीतीचे वातावरण पसरले आहे. पनवेलमधील ग्रामीण भागात कोरोनाचे लोण पसरले असून, एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल परिसरातील कळंबोलीमध्ये 11 व खारघरमध्ये 3 कामोठ्यात 2 असे याअगोदर 16 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते.
पनवेलमधील उलवे ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आल्याने पनवेल परिसरात एकूण 20 इतकी कोरोनाबधितांची संख्या झाली आहे. उलवे ग्रामीणमध्ये आढळून आलेले हे चारही रुग्ण एकाच कुटुंबातील असून ते कुठे गेले होते? कोणाला भेटले होते? यासंदर्भात माहिती घेण्यात येत आहे, तसेच ते राहत असलेली इमारतही सील करण्यात आली असून तेथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उलवे परिसरात सापडलेल्या चारही रुग्णांना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील लोकांना होम क्वारन्टाईन करण्यात आले आहे.