मुंबई - वरळी मतदारसंघातून चार कोटी रुपयांची संशयित रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी घडली. विशेष म्हणजे शिवसेनेचे आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने सर्वांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड यांनी आज (शनिवारी) शिवसेनेने दोन कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ठाकरे घराण्यातील पहिला व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आदित्य ठाकरे यांचा विजय एकतर्फी होईल अशी चर्चा आहे.
आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणारे गौतम गायकवाड यांनी शिवसेनेने निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दोन कोटी रूपये देण्याची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. याबाबत गायकवाड यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी हा आरोप धुडकावून लावला आहे. यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे.
निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान केल्या जाणाऱ्या तापसणीमध्ये वरळी सिलिंक जवळील कोस्ट गार्ड चेक पोस्टजवळ गाडीची (एमएच ४६ एआर ०९३३) तपासणी केली असता त्यामधून चार कोटी रुपयांची रक्कम आढळली आहे. याबाबत निवडणूक विभाग, पोलीस आणि इन्कम टॅक्स विभाग अधिक तपास करत असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.