मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि वेदीक्यूरचे संस्थापक-संचालक तसेच संयुक्त उपचार पद्धतीचे जनक डॉ. अनिल पाटील यांचे शनिवारी रात्री निधन झाले. गेला महिनाभर ते आजारी होते. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कोरोना हे 'चिनी फॅड' आहे, तो भारतीयांचे काहीही बिघडवू शकणार नाही, त्यामुळे त्याला घाबरू नक, असे दावे केल्याने ते चर्चेत होते.
डॉ. पाटील यांचे दादरमध्ये संयुक्त उपचार पद्धती क्लिनिक होते. अनेक वाहिन्यांवरील आरोग्य विषयक कार्यक्रमाद्वारे ते घराघरात पोहोचले होते. मागील महिन्याभरापासून ते आजारी होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. हा आजार बळावला, पुढे किडनी खराब झाली आणि त्यातच शनिवारी रात्री त्यांचा जुहू येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती वेदीक्यूरच्या प्रवक्त्याने दिली आहे. दरम्यान विक्रोळी येथे स्मशानभूमीत आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता, तेव्हा डॉ. पाटील यांनी कोरोनाला घाबरू नका, तो भारतीयांचे काहीही बिघडवू शकत नाही, असा दावा केला होता. त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांना तशा मुलाखती दिल्या होत्या. त्यानंतर ते बरेच चर्चेत होते. तर त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने घेत त्यांना मार्चमध्ये नोटीस बजावली होती. यावर त्यांनी वैद्यकीय परिषदेकडे उत्तर देताना माफी मागितल्याचे समजते आहे.