मुंबई - माजी आमदार आणि बीआरएसचे नेते हर्षवर्धन जाधव हे सध्या (Harshavardhan Jadhav Heart Attack) दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गटकरी यांची भेट घेण्यासाठी जाधव हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आले होते. मात्र, तिथे त्यांची प्रकृती बिघडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी जाधव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचीही माहिती मिळत आहे.
दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू - हर्षवर्धन जाधव यांच्यावर दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हर्षवर्धन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी नुकताच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे.
हर्षवर्धन जाधव बीआरएसमध्ये - आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव बीआरएस पक्षात दाखल झाले आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी हैदराबाद येथे जाऊन बीआरएसमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
हर्षवर्धन जाधव दोनवेळा होते आमदार - हर्षवर्धन जाधव हे भाजप नेता तसेच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नंतर शिवसेनेच्या वतीने आमदार म्हणून ते निवडून आले. त्यांची कारकीर्द तशी वादग्रस्त राहिली, कधी राजकीय वक्तव्यांमुळे तर कधी कौटुंबिक वादात त्यांच्या नावाची चर्चा समाज माध्यमांवर रंगत राहिली. रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांच्यासोबत काडीमोड घेतल्यानंतर संजना या कन्नड मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नजिकच्या भविष्यात त्यांच्या मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात.
हेही वाचा -