मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थापत्य समिती शहराध्यक्षपदी माजी महापौर श्रद्धा जाधव यांची, तर स्थापत्य समिती उपनगर समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेट्ये यांची निवड झाली. श्रद्धा जाधव या शिवसेनाकडून १ डिसेंबर २००९ ते ८ डिसेंबर २०१२ या काळात मुंबईच्या महापौर होत्या. त्यानंतर तब्बल ८ वर्षे त्यांना पालिकेतील कोणतेही मोठे पद देण्यात आलेले नव्हते. ८ वर्षानंतर जाधव यांची पालिकेतील स्थापत्य समिती शहराध्यक्ष पदावर निवड झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२०-२१च्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका श्रद्धा जाधव या १७ मते मिळवून विजयी झाल्या. तर, त्यांच्या प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सुरेखा लोखंडे यांना १३ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दत्ता पोंगडे यांना १७ मते मिळून ते विजयी झाले. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार कृष्णावेणी रेड्डी यांना १३ मते मिळाली.
या निवडणुकीत ३५ सदस्यांनी भाग घेतला, तर ५ सदस्य तटस्थ राहिले. स्थापत्य समिती (शहर) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कार्यरत होत्या. स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीकांत शेट्ये हे १७ मते मिळवून विजयी झाले. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सागरसिंग ठाकूर यांना १२ मते मिळाली.
एकूण ३६ सदस्यांपैकी २९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. २ सदस्य अनुपस्थित होते, तर ५ सदस्य तटस्थ राहिले. तर, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिनेश कुबळ यांना १७ मते मिळवून ते विजयी झाले. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिभा शिंदे यांना ११ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण २९ सदस्यांनी भाग घेतला होता. निवडणुकीत १ मत अवैध ठरले, ५ सदस्य तटस्थ राहिले, तर २ सदस्य मतदानाला अनुपस्थित होते. स्थापत्य समिती (उपनगर) या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे उपमहापौर अॅड. सुहास वाडकर कार्यरत होते.
हेही वाचा- राज्यातील शाळा आणि अंगणवाडी केंद्राना मिळणार मुबलक पाणी