मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने दणका दिला आहे. देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला आहे. (Anil Deshmukh bail case). देशमुख यांची दिवाळी आता कारागृहातच होणार आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने वसुली प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी ते गेली 11 महिने तुरुंगात आहेत.
ईडीने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता. कथित भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशमुखांच्या जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आज गुरुवारी 20 ऑक्टोबर शुक्रवारी रोजी निर्णय दिला आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीनं नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर 71 वर्षीय देशमुख यांनी या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण: अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश यांनी निकाल देताना असे निरीक्षण नोंदवले की, या प्रकरणांमध्ये जबाब महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणीच्या टप्प्यावर समोर आलेल्या तथ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती खून करते तेव्हा कदाचित ती एका क्षणात निर्णय घेते, मात्र आर्थिक गुन्हा हा खूप विचारपूर्वक केला जातो. या प्रकरणात खूप मोठी रक्कम आहे. देशमुख यांना हवे असलेले पुरेशी वैद्यकीय उपचार दिले जात आहेत, असे निरीक्षण नोंदवत विशेष सीबीआय कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
2021 मध्ये झाली होती अटक: अनिल देशमुख यांच्या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी जामीन अर्जावरील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. अनिल देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना गेल्या आठवड्यात 'कोरोनरी अँजिओग्राफी'साठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. देशमुख महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री होते. अनिल देशमुख सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत. मार्च 2021 मध्ये IPS अधिकारी परमबीर सिंह यांनी आरोप केला होता की, तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या आरोपांनंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.
काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.