मुंबई - विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरिता होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी आज(मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि ना. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार संजय दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. तर, भाजपच्या वतीने राजन तेली यांनी आपला उमेवारी अर्ज दाखल केला.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयानंतर रिक्त झालेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व ना. धनंजय मुंडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दानुसार संजय दौंड यांना दिली असून दौंड यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने माजी मंत्री पंडितराव दौंड यांच्या कुटुंबात तब्बल ३० वर्षांनी आमदारकी मिळणार आहे.
संजय दौंड हे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. दोघा पिता पुत्रांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेच्या लढतीत अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती. त्याचवेळी ना. मुंडेंनी शरद पवारांच्या करवी दौंड परिवाराला शब्द दिला होता, असे बोलले जाते. यानिमित्ताने दिलेला शब्द पवारांनी पाळला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
दरम्यान, आज (मंगळवार) विधानभवनात महाआघाडीकडून दौंड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितराव दौंड, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, राजेश्वर आबा चव्हाण, राजेसाहेब देशमुख, गोविंद देशमुख, आदित्य पाटील आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या गटाकडे असलेल्या या जागेसाठी परळी विधानसभा निवडणुकीत दौंड कुटुंबाने केलेल्या सहकार्याची परतफेड करण्याच्या हेतूने ना. मुंडेंनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह करून ही जागा दौंड यांना उमेदवारी मिळावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता धनंजय मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघातून आणखी एक सहकारी विधिमंडळात मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
हेही वाचा - वाडियाच्या बेकायदेशीर कारभारामुळे रुग्णांचेच नुकसान; दिलासा देण्यासाठी उपायांची गरज
तर, दुसरीकडे या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेकरिता भाजपच्या वतीने राजन तेली यांनी आपला उमेवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे दाखल केला. यावेळी विधानरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, भाजपचे आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे नेते विनोद तावडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - माहुलमधील बीपीसीएल रिफायणरीतील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश; कुठलीही जीवितहानी नाही