मुंबई - मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या पत्त्यावर बियर बार तर मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या कार्यालयाच्या पत्त्यावर हुक्का पार्लरचे परवाने जारी करण्यात आले आहेत. पालिकेच्या दुकाने आणि आस्थापना विभागाने हे परवाने दिल्याने पडसाद शुक्रवारी पालिका सभागृहात उमटले. याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करून त्याचा अहवाल लवकरच सभागृहात सादर करण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सभागृहाला दिले.
मुंबई महापालिकेच्या 'डी' विभाग कार्यालयाकडून दुकाने आणि आस्थापनासाठी मुख्यमंत्री आणि आयुक्तांच्या नावे अनुक्रमे बियर बार आणि हुक्का पार्लरची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. ही ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या विरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाणे आणि गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मात्र, यात अधिकारीही दोषी असून नोंदणी करत असताना त्यांनी जागृत असणे आवश्यक होते. हे गंभीर प्रकरण असून याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त हे पद लक्षात घेता रवी राजा यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी ऑनलाईन पद्धतीबाबतच शंका व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांच्या नावे ऑनलाईन नोंदणी करणे, हा गंभीर गुन्हा आहे. ऑनलाईन नोंदणी सुरक्षित आहे? का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यावर सभागृहाच्या संतप्त भावना लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येईल आणि त्याचा अहवाल तातडीने सभागृहापुढे सादर केला जाईल, असे आश्वासन दिले.