मुंबई : दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज सर्वत्र घुमत असताना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्ता संघर्ष अधिक टोकदार होताना दिसत आहे. खरी शिवसेना कोणाची हे सिध्द करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने दोन ट्रक कागदपत्र सादर केले. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे गटाने ही त्याला टक्कर देण्यासाठी त्याच पध्दतीने कागदपत्रांची पूर्तता केली आहे. शिवसेनेवरील हक्काची चढाओढ आका निवडणूक आयोगाच्या दारात स्पष्ट होणार आहे. शिवसेनेचा हक्क कोणाला मिळणार हे या वरुन स्पष्ट होणार असुन या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे साडेआठ लाख कागदपत्रे: केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या आणि त्यांची शपथपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार ठाकरे गटाने नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरून साडेआठ लाख कागदपत्रे सादर केली आहेत. या कागदपत्रांमध्ये शिवसेनेच्या कार्यकारणीसह सर्व शाखाप्रमुख आणि सदस्यांची शपथपत्रे असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे.
शिंदे गटाचे आधिक अडीच लाखावर कागदपत्रे: शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कागद पत्रांची पुर्तता करताच या कागदपत्रांना आव्हान म्हणून शिंदे गटानेही त्याच पध्दतीने कागद पत्रल सादर केली आहेत. शिंदे गटाने दिलेली कागदपत्रे अडीच लाखापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शिंदे गटाने आणखी साडेसात लाख शपथपत्रे सादर करून शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यापेक्षा अधिक शपथपत्रे सादर केल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.
काय आहे नेमका वाद : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी आणि आमदारांनी आपणच खरी शिवसेना असून उद्धव ठाकरे यांच्यासोबत कमी संख्या असल्याने त्यांची शिवसेना ही मूळ शिवसेना नाही त्यामुळे आपल्यालाच खरी शिवसेना अशी मान्यता मिळावी असा दावा निवडणूक आयोगाकडे केला. या संदर्भात निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना वेगळी चिन्हे आणि वेळी नावे तात्पुरती दिली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव शिंदे गटाला देण्यात आले आहे तर त्यांना ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले असून या गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे.
चिन्हावर खरा हक्क कोणाचा : मात्र तरीही शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर खरा हक्क कोणाचा ही लढाई अद्याप संपलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या या लढाईसाठी दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचा आदेश देण्यात आला होता. आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात चेंडू आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर लवकरच निवडणूक आयोगाकडून मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे उद्धव ठाकरे हे तिचे खरे राजकीय वारसदार आहेत आणि त्यांच्याच अधिपत्याखाली शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहील त्यामुळे शिवसेना हे नाव आणि चिन्ह आम्हाला परत मिळेल असा विश्वास शिवसेना प्रवक्ता किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रकरण न्याय प्रविष्ठ : शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेना कोणाची हा वाद न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने चिन्ह आणि पक्षाच्या वादावर निवडणूक आयोगाला मार्ग काढण्याचे सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर फुटीर शिंदे गट आणि शिवसेनेला कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाची कागदपत्रे मिळावीत. या ठाकरे गटाच्या मागणीवर शिंदे गटालाही निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. सविस्तर कागदपत्रांची यादी सादर करण्याचे आदेश आयोगाने शिंदे गटाला दिले. सेनेचे धनुष्यबाण चिन्ह वादात सापडल्याने शिवसेनेची डोकेदूखी वाढली आहे. मात्र, चिन्ह शिवसेनेला मिळाल्यास शिंदे गटाकडून पुन्हा आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आपल्या विभागाची बैठक घेऊन अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत, किंवा काय करता येईल, याबाबत चाचपणी करुन ठेवली आहे.