मुंबई- मिठी नदीला लागून असलेल्या कुर्ल्यातील सीएसटी रोडवरील रहिवाशांना पावसामुळे साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. हे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सीएसटी रोड येथे रास्ता रोको केला.
२६ जुलै २००५ ला मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. यावेळी मिठी नदीच्या जवळील कुर्ला परिसराला पाण्याची सर्वात जास्त झळ पोहचली होती. त्यानंतर याठिकाणी विविध कामे करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले, असे पालिका व इतर प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, मिठी नदीला लागून असलेल्या कपाडिया नगर, सीएसटी रोड परिसरात आजही पाणी साचते, याचा येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मागील आठवड्यात पडलेल्या पावसादरम्यान कपाडिया नगरमधील १०५ घरात पाणी शिरले होते. हे पाणी १६ ते २० तास घरांमध्ये साचून होते, यामुळे रहिवाशांचे नुकसान झाले. या भागातील तसेच कुर्ला सीएसटी रस्त्यावर पावसाचे साचलेले पाणी समुद्रात आणि नाल्यात जाण्यासाठी एकही गटार बनवण्यात आलेले नाही. मलनिस्सारण वाहिन्या, नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ असावे, या मागण्यांबाबत गेले तीन वर्षे पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. यामुळे आज रास्ता रोको आंदोलन करावे लागले, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी सांगितले.