मुंबई - ७२ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नवीन राष्ट्रवादी भवन येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलातर्फे भारतीय तिरंग्याला सलामी देण्यात आली.
ध्वजारोहणानंतर दिलीप वळसे-पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावतीने सर्वांना शुभेच्छा दिल्या. या वेळी, त्यांनी लोकशाहीचे महत्त्व सांगितले. 'मागील वर्ष कोरोनामुळे अतिशय संघर्षाचे आणि अटीतटीचे गेले. या काळात कोविड योद्धे डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांनी कोरोनावर मात करण्यासाठी आपले कर्तव्य बजावले. हे काम करत असताना आपल्यातले अनेक लोक आपल्याला सोडून गेले,' असे म्हणत त्यांनी पक्षाच्या वतीने दिवंगत कोविड योद्ध्यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिन २०२१ : हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं अभिवादन
'सध्या देशातील शेतकरी, कामगार अडचणीत आहे. केंद्र सरकारने कुणालाही विश्वासात न घेता तीन कृषी कायदे पारित केले. कामगारांना अडचणीत टाकणाऱ्या चार संहिता मंजूर केल्या. एका हुकूमशाही वृत्तीचे वर्तन केंद्राने दाखवून दिले,' असा आरोप वळसे-पाटील केला. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जी घटना दिली, त्याप्रमाणे आपण काम करत राहू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा घटनेप्रमाणेच प्रत्येक घटकासाठी काम करणारा पक्ष आहे. पुढच्या काळात देखील घटनेचे मूल्य जपत काम करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया,' असे आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केले.
या वेळी, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'भारताचे अखंडत्व जपण्यासाठी आपण प्रयत्न करत राहूया. शेतकऱ्यांना व श्रमिकांना आधार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आंदोलनात उतरला आहे. आपण सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी या आंदोलनात सहभागी व्हावे', असे आवाहन खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.
या वेळी, माजी आमदार विद्या चव्हाण, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, सेवा दलाचे अध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष डॉ. जानबा म्हस्के, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस दिनकर तावडे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, क्लाइड क्रास्टो, संजय तटकरे, महेश चव्हाण, मुंबई प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्ष सोहेल सुभेदार, मुंबई प्रदेश अल्पसंख्याक माजी अध्यक्ष मुबारक खान, मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, मुंबई प्रदेश युवती अध्यक्ष अदिती नलावडे, मुंबई प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष अॅड. अमोल मातेले तसेच प्रदेश व मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - नवरा-बायकोतील अंड्यांचे भांडण पोहोचले पोलीस ठाण्यात!