मुंबई - कॅशलेस टोलवसुली व्हावी आणि टोल नाक्यांवरील वाहनांची गर्दी दूर करण्यासाठी फास्टटॅग ही अत्याधुनिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व टोलनाक्यांवर ही फास्टटॅग प्रणाली दोन मार्गिकांवर कार्यान्वित करण्यात आली आहे. तर लवकरच राज्यात 100 फास्टटॅगची अंमलबजावणी होणार आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ने वाहनचालकांना एक खुशखबर दिली आहे. आता फास्टटॅगवर वाहनचालकांना 5 टक्के कॅशबॅकची सवलत देण्यात आली आहे. पण ही सवलत केवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्यांसाठीच असून ही सवलत 11 जानेवारीपासून लागू होणार आहे.
विना फास्टटॅग प्रवास करणाऱ्यांकडून दुप्पट टोल वसूली -
गेल्यावर्षी केंद्र सरकारने फास्टटॅग बंधनकारक केले होते. पण देशभर कमी वेळात फास्टटॅग उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने तसेच या प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ हवा असल्याने 100 टक्के अंमलबजावणीला गेल्या वर्षी मुदतवाढ देण्यात आली. तर आता 1 जानेवारीपासून फास्टटॅग 100 टक्के बंधनकारक करण्यात आले आहे. पण राज्यात मात्र याची अंमलबजावणी दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. याची तयारी सुरू असून पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि सी लिंकवर होणार आहे. 100 टक्के फास्टटॅग लागू झाल्यास विना फास्टटॅग प्रवास करणाऱ्यांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.
मर्यादित काळासाठी 5 टक्के कॅशबॅक -
फास्टटॅगबाबत एमएसआरडीसीकडून जनजागृती सुरू आहे. रेडिओच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येत आहे. तर फूड प्लाझासह अनेक ठिकाणी फास्टटॅग स्टिकर उपलब्ध करून दिले जात आहे. तर आता एमएसआरडीसीने प्रोत्साहन म्हणून फास्टटॅगवर 5 टक्के कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सी लिंकसाठी ही सवलत आहे. तर ही सवलत मर्यादित काळासाठी असणार आहे. ही सवलत नेमकी कधीपर्यंत असेल हे अद्याप ठरवण्यात आले नसल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे.
हेही वाचा - गावाच्या विकासासाठी 'तृतीयपंथी' अंजलीने खोचला पदर!