मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यानुसार मतदार यादीतील काही दुबार नावे अथवा मयत मतदारांची नावे वगळण्यात आली तर काही मतदारांची नव्याने नावे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये तरुण मतदारांचा अधिक समावेश आहे. हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
किती मतदार वगळले? या मतदार यादीत दुबार आणि मयत अशा सुमारे 5 लाख 75 हजार 214 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. यात 2 लाख 77 हजार 122 महिला मतदार आणि 2 लाख 98 हजार 63 पुरुष मतदार वगळण्यात आले असून 29 तृतीयपंथीय मतदारांचाही यात समावेश आहे.
नव्या मतदारांची नोंदणी: सुमारे पावणे सहा लाख मतदार जरी यादीतून वगळण्यात आले असले तरी नव्याने मतदारांची नोंदणीही करण्यात आली आहे. मतदार यादीत 5 लाख 23 हजार 634 नवीन मतदार नोंदवले गेले आहेत. त्यापैकी 18 ते 19 वयोगटातील सुमारे 1 लाख 43 हजार 283 मतदार आहेत. 20 ते 25 वयोगटादरम्यान 2 लाख 38 हजार 196 मतदारांची नोंदणी झाली आहे. तर 26 ते 29 वयोगटातील 1 लाख 13 हजार 858 तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांसाठी मतदार यादी अद्ययावत करताना या मतदार यादीत तरुण मतदारांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती तरुण मतदार? तरुण मतदारांमध्ये सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील 12 हजार 259 मतदारांची नोंद आहे. पुणे जिल्ह्यातील तरुण मतदार 10 हजार 440 इतके नोंदवले गेले आहेत. मुंबई उपनगरात 9364 तरुण मतदार तर मुंबई शहरात 3 हजार 17 तरुण मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
ग्राफिक्स आउट: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी सूचना वारंवार येतात. यापूर्वी तरुण मतदारांची नोंदणी ही केवळ जानेवारी महिन्यात केली जायची; मात्र आता तरुण मतदारांची नोंदणी ही वर्षातून चार वेळा जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात करण्यात येते. त्यामुळे युवा मतदारांची संख्या वाढत असून अधिकाधिक तरुण मतदार नोंदणीचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लक्ष्य साध्य होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्यांदा मतदानाचा आनंद: एका तरूणाने सांगितले की, त्याचे नाव पहिल्यांदा मतदार यादीत समाविष्ट झाले आहे. मतदानाची प्रक्रिया ही अद्भुत गोष्ट असून भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आपले भविष्य ठरवण्याची ही संधी आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार असल्याने आपल्याला खूप आनंद होत आहे.
हेही वाचा: