मुंबई : शिवसेना फुटल्यानंतर शिवसेना (उबाठा) गटातील अनेक आजी-माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. आतापर्यंत शिवसेनेच्या ठाकरे गटातील 18 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसचेही नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. शिंदे गटानंही काँग्रेसला दणका दिला असून आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटात (शिवसेना) दाखल होणार आहेत.
वर्षा गायकवाड यांना धक्का : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आपला मुंबई अध्यक्ष बदलला आहे. मात्र, वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या मतदारसंघातील चार, चांदिवलीतील एका माजी नगरसेवकाने (शिवसेना) शिंदे गटाची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे. सायन कोळीवाड्यातील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील माजी नगरसेवक वजित कुरेशी, धारावीतील माजी नगरसेवक भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने यांचा आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा जोरदार धक्का मानला जात आहे.
माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं धारावी विधानसभा मतदारसंघातील आमदार प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. वर्षा गायकवाड यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चांगले यश मिळेल, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीला वैतागून माजी नगरसेवकांनी (शिवसेना) शिंदे गटाची वाट धरण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेची ताकद वाढणार : ठाकरे गटातून शिवसेनेत सुमारे पंधरा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. आगामी निवडणूक पाहता आणखी काही नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचे राजकारण सध्या दिसून येत आहे. आतापर्यंत शिवसेनेत यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, संतोष खरात, दिलीप लांडे, परमेश्ववर कदम, आत्माराम चाचे, वेशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, अमेय घोले, किरण लांडगे, चंद्रावती मोरे, सुवर्णा करंजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं जाणकारांचं मत आहे.
हेही वाचा -