मुंबई : भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस २०१९ मध्ये पहिल्यांदा धावली. त्यानंतर मुंबईमधून मध्य रेल्वे मार्गावर ही ट्रेन कधी धावणार अशी उत्सुकता सर्वाना होती. ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. मुंबईहून सुटणाऱ्या मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी दोन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पैकी एक आज रात्री किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत तर दुसरी ६ फेब्रुवारीला मुंबईत आणली जाणार आहे. या ट्रेनची घाट विभागात चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
ट्रेन मुंबईत पोहचणार : वंदे भारत ट्रेन आज सकाळी पुणे यार्डात पोहोचली आणि ती आज रात्री किंवा उद्या लवकर मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावर धावणाऱ्या दोन्ही ट्रेन चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि सोलापूर दरम्यानची वंदे भारत एक्सप्रेस पुण्याकडे जाताना कर्जत आणि खंडाळा दरम्यान स्थित भोर घाटातून धावण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणांमधील सुमारे ४५५ किलोमीटरचे अंतर ६.३५ तासात कापण्याची शक्यता आहे. तर मुंबई-शिर्डी सेमी हाय-स्पीड ट्रेन कसारा येथील थळ घाटातून धावेल. ५.२५ तासांमध्ये त्यांच्यातील सुमारे ३४० अंतर कापेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
बँकर्स न लावता होणार चाचणी : आज रात्री किंवा उद्या शुक्रवारी सकाळी एक ट्रेन मुंबईत आल्यावर त्या ट्रेनला पार्किंग ब्रेक लावले जाणार आहेत. त्यानंतर मध्य रेल्वेवरील लोणावळा खंडाळा यासारखे घाट ओलांडण्यासाठी अतिरिक्त लोकोमोटिव्ह तैनात करण्याची गरज आहे की नाही हे तपासण्यासाठी चाचणी घेतली जाणार आहे. घाट विभागात बॅंकर्सचा वापर गाड्या ढकलण्यासाठी केला जातो आणि डबे तुटल्यास ट्रेन मागे जाण्याच्या घटना टाळल्या जातात. परंतु बँकर्सला जोडण्याच्या आणि विलग करण्याच्या प्रक्रियेस किमान काही मिनिटे लागतात, तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. हा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी, रेल्वे अधिकाऱ्यांनी बँकर न जोडता या दोन्ही मार्गांवर सेमी हाय-स्पीड गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे वंदे भारत एक्सप्रेस : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही रेल्वेगाडी चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये उत्पादित करण्यात आली. भारत सरकारच्या मेक इन इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत १८ महिन्यांच्या कालावधीत १०० कोटी रुपये खर्चून ह्या रेल्वेगाडीची संकल्पना, विकास व निर्मिती केली गेली. १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिली वंदे भारत एक्सप्रेस नवी दिल्ली ते वाराणसी ह्या शहरांदरम्यान धावली. ही ट्रेन ताशी १२० किलोमीटर वेगाने धावते. या गाडीचे सर्व डबे वातानुकूलित आहेत. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिडीओ प्रणाली, स्वयंचलित खिडक्या दरवाजे, अत्याधुनिक सीसीटीव्ही, इमरजन्सी पुश बटन, व्हॅक्युम सुविधा असलेले शौचालये, १८० अंश फिरणारी आसने आदी सुविधा या ट्रेनमध्ये आहे. या ट्रेनच्या धावण्याच्या गतीमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासामधील वेळ वाचणार आहे.