मुंबई : राजधानी मुंबईतील मंत्रालय हे नेहमीच नागरिकांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी गजबजलेले असते. सर्वसामान्य माणसांपासून ते आमदार, खासदार, मंत्री दररोज मंत्रालयात येत असतात. सर्वसामान्य व्यक्तींना दुपारनंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे दुपारी दोन वाजता मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे एक किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता लवकरच या समस्येवर उतारा मिळणार असून, केवळ चेहरा दाखवल्यानंतर नागरिकांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. केवळ काही सेकंदात चेहरा दाखवून प्रवेशिका तयार करताच मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी फेशियल रिकॉग्निशन सिस्टम म्हणजेच एफआरएस ही प्रणाली राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडल्याची माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानूटीया यांनी दिली.
काय आहे सध्याची प्रणाली : मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी सध्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र दाखवून प्रवेशिका दिली जाते. मात्र यासाठी बराच वेळ लागतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. त्या दिवशी ही रांग एक किलोमीटर पर्यंत दूर जाते आणि मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने एफआरएस ही प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय असेल नवीन प्रणाली : मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना आता केवळ आपला चेहरा मशिन समोर दाखवावा लागणार आहे. व्यक्तीचा चेहरा समोर येताच त्याची सर्व माहिती उपलब्ध होणार असून, त्याला काही सेकंदांमध्ये मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. ही प्रणाली भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला मंत्रालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर वापरली जाणार आहे. त्यामुळे सुरुवातीला ही प्रणाली वापरताना काही अडचणी आल्या तर त्यावर मात केली जाणार आहे. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली येत्या काही दिवसात सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पराग जैन यांनी सांगितले. एफआरएस प्रणालीद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर करून त्या व्यक्तीची ओळख तपासली जाऊ शकते. त्यासाठी त्याचा फोटो किंवा एखादा व्हिडिओ किंवा रियल टाईममध्ये व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -