मुंबई - मी छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांच्या नावाने शपथ घेतली. जर हा गुन्हा असेल तर पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक जन्मात मी पुन्हा अशीच शपथ घेईन. जो आपल्या दैवताला मानत नाही, आई-वडिलांना मानत नाही तो जगायच्या लायकीचा नाही, अशा शब्दांत भाजपने सभागृहात मांडलेल्या आक्षेपाच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. तर सभागृहाच्या कामकाजाची पद्धत बाजूला ठेवून नको ते विषय इथे माडंले गेले, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
विश्वासदर्शक ठरावाची चाचणी बहुमताने जिकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व आमदारांचे आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानले. जनतेच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते, असेही ते यावेळी म्हणाले. आयुष्यात पहिल्यांदा या सभागृहात आलो आहे. याठिकाणी येत असताना दडपण होते, कारण याठिकाणी कसे वागायचे हे मला ठाऊक नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - गांधी परिवाराची 'एसपीजी' सुरक्षा काढल्यावरून 'सामना'तून शाहांवर निशाणा
महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यासाठी बहुमत चाचणी आज (शनिवारी) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केले. यामध्ये १६९ आमदारांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले. तर 4 आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भाजपाने हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी 'दादागिरी नही चलेगी' अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
हेही वाचा - हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मी मैदानातील माणूस आहे. सभागृहात कसे होईल याची मला चिंता होती. मात्र, याठिकाणी आल्यावर कळले मैदानातच चांगले असते, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसेच मी समोरा-समोर लढणारा आहे, शत्रूला अंगावर घेणार आहे, असे म्हणत त्यांनी भाजपाने सभागृहात घातलेल्या गोंधळावर घणाघात घातला.