मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणात केलेली अटक बेकायदा असून काल विशेष न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या विषयावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Fadnavis ) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नेत्यांनी शांत राहायचे : याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुटके नंतर संजय राऊत काय बोलले ते मी ऐकले नाही. म्हणून कुठलीही प्रतिक्रिया मी देणार नाही.पण राजकारणातली कटूता दूर करायची असेल तर सर्वांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष भूमिका घेऊ शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचे आणि इतरांना बोलायला लावायचे, ही जी पद्धत आहे ती बंद करावी लागेल,असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच संजय राऊत जर मला भेटणार असतील तर मी भेटायला तयार आहे. कारण मी सर्वांनाच भेटत असतो त्यामुळे त्यात काय विशेष नाही असेही फडणवीस म्हणाले.तसेच कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. तो योग्य की अयोग्य ते ईडी बोलेल. ते याच्या विरुद्ध उच्च न्यायालयात गेलेले आहेत. तिथे सुनावणी सुरू आहे. म्हणून त्यावर काही बोलणे माझ्यासाठी तरी योग्य वाटत नाही, असेही फडणवीस म्हणाले.
अफजल खान कबर अनधिकृत : प्रतापगड येथील अफजल खान कबरी वर झालेले अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली आहे त्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २००७ साली हे बांधकाम तोडण्यासाठी कोर्टाने निर्णय दिला होता. २०१७ साली आम्ही कारवाई सुरू केली परंतु त्यात पुन्हा अडथळे आले. हे बांधकाम तोडण्यासाठी शिवप्रेमींची सातत्याने मागणी होती. अगोदर ज्यांनी ही मागणी केली त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले. आज ही कारवाई होत आहे ही समाधानाची बाब आहे, असेही फडणवीस म्हणाले.
वन नेशन वन इलेक्शन : वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, याबाबत माझे पूर्ण समर्थन आहे. मला माहित आहे हे कठीण आहे परंतु असे व्हायला पाहिजे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती स्थापन केली होती. त्यामध्ये असे समजले की वर्षाचे ३६५ दिवस कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने आचारसंहिता असते, म्हणून जर या सर्व निवडणुका एकत्रित झाल्या तर मोठ्या प्रमाणात खर्चही वाचेल असेही फडणवीस म्हणाले.