मुंबई : महानगरक्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यासाठी रविवारी, २६ जुलैपासून ऑलनाईन नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी आज शिक्षण उपसंचालक विभागाने या प्रवेशासाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगबाद, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे सर्व प्रवेश हे ऑनलाईन पदधतीने केले जातात. त्यासाठी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी या ऑनलाईन नोंदणीचा पहिला टप्पा विद्यार्थ्यांकडून भरून घेतला जातो. मुंबई विभागात https://mumbai.11thadmission.org.in या संकेतस्थळावर ही प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानुसार २६ जुलैपासून अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रवेश अर्जातील भाग- १ भरणे, तसेच माहिती प्रमाणित करण्यासाठी जवळची शाळा, मार्गदर्शन केंद्र निवडावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित शाळा आणि मार्गदर्शन केंद्रावर अर्जातील त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातील.
तर, दहावीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील माहिती आणि ज्या पसंतीचे महाविद्यालय हवे आहेत, त्यांची नावे अर्जात ऑनलाईन भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी शिक्षण मंडळाने सरावासाठी सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी २४ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना लाभ घेता येऊ शकणार आहे. कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळी सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असून त्यासाठी शाळांना काही अधिकार देण्यात आले आहेत अशी माहिती प्रभारी शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. ऑनलाईन अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी आल्यास त्यासाठी मुख्याध्यापक आणि शाळांमधून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सूचनाही दिल्या आहेत.
मुंबई महानगरक्षेत्रातील सर्व मंडळाच्या माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-१ मधील माहिती ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणित करावे तसेच विद्यार्थी, पालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील भाग-१ मधील माहिती प्रमाणित करण्यासाठी शाळांनी गतवर्षीचेच लॉगीन आयडी व पासवर्ड वापरावेत. शाळास्तरावरून अर्ज अप्रुव्ह करण्याची कार्यवाहीसुद्धा ऑनलाईनच करावी अशा सूचना केल्या आहेत.