पालघर - जगातील पाहिली लोकल ट्रेन चर्चगेट ते विरार मार्गावर धावली होती. १२ एप्रिल, १८६७ रोजी आजच्याच दिवशी ही लोकल धावली होती. या घटनेला आज एकशे बावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६.४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.
महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसऱ्या श्रेणीचा डबा असायचा. याव्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसऱ्या श्रेणीने प्रवास करायचे. प्रति मैलाचा दर होता ७ पैसे! तिसऱ्या श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आजच्या तुलनेत कमी वेळात पूर्ण होत असे. याचे कारण मधे स्थानके कमी होती.
त्यावेळी अशी होती स्थानके -
नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर) आणि ग्रँट रोड.
काळानुरुप या लोकलमध्ये अनेक बदल होत गेले. ही गाडी आता ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली आहे. नंतरच्या काळात या मार्गावर पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे पीआरओ डेव्हीड कुमार यांनी दिली.