मुंबई : जगभरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. या चाचणीत एकूण काही प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. काही प्रवाशांना कोरोनाच्या ओमायक्रॉन बी १.१ व्हेरीयंटची लागण झाल्याची माहिती होती. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही मिहिती दिली आहे. हे सर्व प्रवासी चीन, जापान, अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्राजील आणि फ्रान्स आदी देशांमधून आले होते. कोविड - १९ च्या रुग्ण संख्येत अचानक झालेली वाढ पाहता भारत सरकारने अद्ययावत सूचना प्रसारित केल्या आहेत. त्यानुसार या देशातून आलेल्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे. या चाचणी दरम्यान आतापर्यंत एकूण ९ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
ओमायक्रोन बी १.१ ची लागण : नवे वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या कोविड मृत्यूची नोंद मुंबईत नोंदवण्यात आली. मुंबई बीएमसीकडून रूग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत रूग्णाचे वय 68 वर्ष होते. 22 डिसेंबर रोजी मुंबईत कोविडच्या मृत्यूची नोंद झाली होती. सध्या कोरोनाच्या दृष्टीने अनेक सतर्कतेची पावले उचलली जात आहे. विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. ओमायक्रोन बी १.१ ची लागण पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. ९ पैकी २ प्रवाशांचे अहवाल आले असून त्यामधील २ जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन बी १.१ व्हेरीयंटची लागण झाल्याचे समोर आले होते. कोरोनाच्या ओमायक्रोन बी १.१ व्हेरीयंटची लागण झालेल्या २ प्रवाशांपैकी एक पुरुष तर एक महिला प्रवासी होती. १६ वर्षाचा तरुण प्रवासी २६ डिसेंबर २०२२ रोजी लंडन येथून आला होता. तसेच २५ वर्षीय महिला २८ डिसेंबरला स्विझरलंड येथून आली होती. ती नवी मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
पॉझिटिव्ह प्रवाशांना केले जाते क्वारंटाईन : मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीत पॉझीटिव्ह आढळून येणाऱ्या तसेच मुंबई शहरात पॉझीटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही येथे पाठवले जात आहेत. विमानतळावर आढळून येणाऱ्या पॉझिटिव्ह प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. या प्रवाशांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर किंवा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यावर डिस्चार्ज दिला जात आहे. तसेच पॉझीटिव्ह आढळून आलेल्या प्रवासी आणि नागरिकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेवून त्यांची तपासणी केली जात असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : Covid Vaccine : कोरोना प्रतिबंध लसीच्या हेटरोलॉगस बूस्टर डोसला मान्यता