मुंबई- येथील साकीनाका परिसरातील खैरानी रोड जवळील आशापुरा कंपाउंडमधील थिनर रासायनिक कंपनीला भीषण आग लागली आहे. सुमारे 5 वाजता ही आग लागली. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल प्रयत्न करीत आहे. आगीच्या धुराचे लोळ लांब पर्यंत पसरले आहेत. यात साधारण 30 ते 35 गाळे जळल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा- 'त्या' नेत्यांनाही सीमेवर गोळ्या घाला, 'कर्नाटक नवनिर्माण सेना' अध्यक्षाचे वादग्रस्त विधान
साकीनाका परिसरात लागलेल्या आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे अंधार पसरलेला आहे. मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर आलेला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. मात्र, येथे असलेल्या रासायनिक व लाकडाच्या मोठ्या प्रमाणामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. घाटकोपर परिसरातील साकीनाका परिसर नेहमीच आगीच्या घटनांनी चर्चेत असते. बघ्यांची गर्दी व सुरक्षेच्या दृष्टीने जमावाला पांगवण्यासाठी पोलीस दाखल झाले आहे. या आगीचा धूर चार ते पाच किलोमीटरपर्यंत पसरला आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या ठिकाणी वायर, भंगार, गोणी, प्लास्टिक, फर्निचर, केमिकलचे गोडाऊन आहेत. या आगीचे पसरल्याचे लोळ घाटकोपर, विक्रोळी, साकीनाका परिसरातून दिसत आहे.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. येथे आग लागण्याचे कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी वारंवार आग येथील परिसरात लागले. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी येथील गाळेधारकांनी पुढाकार घेतला पाहिजे, पालिकेनेही याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले.