मुंबई Fire in Byculla : मुंबईच्या भायखळा परिसरातून एक मोठी दुर्घटना समोर आलीय. भायखळ्यातील मदनपुरा येथे सैफी इमारतीला सकाळी 8 च्या सुमारास भीषण आग लागलीय. या आगीत काही रहिवासी अडकून पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तब्बल 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळं लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बचाव कार्य सुरु : मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा परिसरातील मदनपुरा परिसरात सैफी इमारत आहे. या इमारतीला सकाळी 8 च्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीत राहत असलेल्या रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. बघता-बघता आगीनं इमारतीला विळखा घातला. या आगीत काहीजण अडकल्याची माहिती समोर आलीय. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांत वाढ : गेल्या काही दिवसांत मुंबईतील विविध भागांत अनेक आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मागील आठवड्यात 7 तारखेला दादर (प.) प्लाझा सिनेमागृहाजवळ असलेल्या कोहिनूर टॉवरमधील मुंबई महापालिकेच्या पार्किंगच्या जागेत रात्री अचानकपणे भीषण आग लागली होती. या आगीत 16 चारचाकी तर 2 दुचाकी अशी 18 वाहनं जळून खाक झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आगीच्या घटनांबाबतच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यापुर्वी देखील गोरेगाव पश्चिम येथील एम. जी. रोड मार्गावरील आझाद मैदान परिसरात असलेल्या इमारतीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत तब्बल 8 ते 9 लोकांनी आपला जीव गमावला होता. त्यामुळं वाढत्या आगीच्या घटनांनंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य सरकारनं याबाबत काही तरी ठोस पाऊलं उचलावी, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा :