मुंबई- अंधेरी एमआयडीसीमधील रोलटा टेक्नॉलॉजी पार्कच्या दुसऱ्या माळ्याला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. ही आग वाढत जात पूर्ण इमारतीमध्ये पसरली. अग्निशामक दलाला तब्बल सहा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र, कूलिंग ऑपरेशनच्या वेळी पुन्हा एकदा इमारतीत आग लागल्याची घटना घडली, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा काचा फोडून कूलिंगचे काम हाती घेतले होते. परंतु, पुन्हा एकदा सांयकाळी 7 वाजताच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावर आग लागली. मात्र, सध्या आग नियंत्रणात आहे.
हेही वाचा- 'कोरोनाने भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी'
रोलटा टेक्नॉलॉजी पार्क ही व्यावसायिक इमारत गेल्या दीड वर्षापासून बंद असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही इमारत तळमजला अधिक तीन मजल्याची आहे. तळमजल्यावर आयसीआयसी बँक आहे. दरम्यान, इमारतीच्या सर्वरमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही इमारत पूर्णतः काचेची आहे. तिच्यावर बाहेरून अॅल्युमिनीयमचे आवरण आहे. त्यामुळे ही आग वाढतच गेली. त्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत रोलटा कंपनी जळून खाक झाली. तर तळमजल्यावरील आयसीआयसी बँकेचेही नुकसान झाले आहे.