मुंबई - दहिसर कांदरपाडा येथे कोरोना सेंटरच्या आसीयुमध्ये आग लागली. रुग्णाशेजारी ही आग लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला होता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने ही आग आटोक्यात आली.
दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० रुग्ण शय्या क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित असून त्याचे संचालन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) यंत्राने आज दुपारी २ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास पेट घेतला. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्णशय्येपासून दूर केले. संयंत्राचा वीजपुरवठा खंडीत केला. आजूबाजूच्या इतर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी, वॉर्डबॉय जतीन यांच्यासह इतर कर्मचारी यांनी जवळच उपलब्ध असलेले अग्निरोधक उपकरण आणले आणि पेटलेले वैद्यकीय यंत्र क्षणार्धात विझवले. प्रसंगावधान राखून आग विझवल्याने पुढील दुर्घटना टळली. या परिचारिका तसेच वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.