मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॅगच्या अहवालानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडे सात विभागांच्या चौकशीचा अहवाल पाठवायचा आहे. एसआयटीने पाच विभागांची चौकशी वेगवान सुरू केली आहे. तीन प्राथमिक चौकशी प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. रस्ते, पूल, स्ट्रॉम वॉटर तांत्रिक विभाग (आयटी) या चार विभागांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चार मुख्य अभियंता आणि आयटी विभागाचे संचालक यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात करण्यात आली आहे.
'या' पाच अधिकाऱ्यांची चौकशी : महापालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता मनीष कुमार पटेल, आयटी विभागाचे संचालक शरद उघडे, सांडपाणी विभागाचे मुख्य अभियंता अशोक मुंग्रे, स्ट्रॉम वॉटर विभागाचे मुख्य अभियंता आशिष जागिंदर आणि पूल (ब्रिजेस) विभागाचे मुख्य अभियंता संजय कोंडालेपुरे या पाच अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात एसआयटीने चौकशी केली आहे. सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेचे एसआयटी पथक गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी तपास करत आहे. महापालिका मुख्यालयात जाऊन टीमने तपास सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार हे देखील स्वतः तीनदा या प्रकरणी चौकशीसाठी महापालिका मुख्यालयात गेले असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित कागदपत्रे एसआयटीच्या अधिकाऱ्याकडे जमा: मुंबईतील 12 हजार कोटीच्या घोटाळ्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी (SIT) स्थापन झाल्यानंतर अनेकदा महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. 2011 ते 2019 या दरम्यान झालेल्या संबंधित विभागातील आर्थिक अनियमितते बाबत ही चौकशी होत आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे एसआयटीच्या अधिकाऱ्याने जमा केली आहेत.
कॅगच्या अहवालात अनियमितता उघड : कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या अहवालात मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. यानंतर भाजपाकडून या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.
पोलीस आयुक्तांना एसआयटी चौकशीचे आदेश : अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य केली. जून महिन्यात या सगळ्या कारभाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिकेचे मुख्य अभियंता (नियोजन) सुनील राठोड यांच्या दालनात हे एसआयटीचे पथक दाखल झाले होते. त्या ठिकाणीसुद्धा या पथकाने विभागातील कारभारासंदर्भात चौकशी केली होती.
महापालिका अधिकाऱ्यांचीही चौकशी : आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी आर्थिक गुन्हे शाखेने कॅगच्या अहवालासंदर्भात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले होते. या अधिकाऱ्यांकडून आर्थिक गुन्हे शाखेने अधिक माहिती मिळवली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सगळ्या चौकशीसंदर्भात उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांनी सांगितले की, आज दुसऱ्या दिवशी देखील आम्ही महापालिका मुख्यालयात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पाहणी करून ते ताब्यात घेण्यासाठी आलो आहोत. त्याचप्रमाणे हा एसआयटी चौकशीचा भाग असल्याचे देखील त्यांनी सांगितले. विविध विभागांची ही चौकशी सुरू राहणार असून कॅगच्या अहवालानुसार ही चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले. कोविड काळात झालेला हा घोटाळा चांगलाच गाजला होता. यामुळे मुंबई महापालिकेचे पितळ उघडे पडले होते. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.
हेही वाचा:
- BMC Covid Scam : कथित कोविड घोटाळा प्रकरण; विशेष तपास पथक आज बीएमसी कार्यालयात झाडाझडती घेण्याची शक्यता
- Mumbai Covid Contract Scam : मुंबई महानगरपालिका कोविड कंत्राट घोटाळा प्रकरण; ईडीकडून संजीव जयस्वाल यांची सलग 11 तास चौकशी
- ED Raid in Mumbai : कोव्हिड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची दोन दिवस कारवाई, आतापर्यंत काय घडले?