मुंबई - भारत आणि चीनचे आपापसातील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू आहे. ज्या चिनी मालावर बहिष्कार टाकला जात आहे त्याचा चीनला काहीही तोटा होणार नाही उलट यात भारताचे नुकसान होईल, असे सामाजिक व आर्थिक विश्लेषक पंकज जयस्वाल यांनी म्हटले आहे.
आपण ज्या मालावर बहिष्कार टाकत आहोत तो भारताने अगोदरच विकत घेतलेला आहे. त्याचे शंभर टक्के पेमेंट चीनला दिले गेलेले आहे. त्यामुळे आपल्या देशात आलेला माल हा आता आपला आहे. त्या मालावर बहिष्कार टाकून आणि त्याची होळी करून आपण आपल्याच देशाचे आर्थिक नुकसान करत आहोत, असे जयस्वाल यांनी सांगितले.
कट ऑफ डेट म्हणजेच आजपासून भारतात कोणत्याही चीनच्या वस्तूंचा व्यापार आणि आयात होणार नाही, याची सरकारने काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच चीनच्या वस्तू आयात होण्यावर बंदी आणली पाहिजे. असे झाले तरच चीनचा तोटा आहे. सामान्य लोकांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्यापेक्षा चीनवरून होणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी सरकारला केली पाहिजे. भारतासोबतच्या व्यापारामुळे चीनला मोठ्या प्रमाणात नफा होतो. तोच नफा ते सैन्यावर खर्च करतात, असेही जयस्वाल म्हणाले.
चिनचे सैन्य भारतीय सैन्यावर वारंवार आक्रमण करत आहेत. हे जर रोखायचा असेल तर मुळात त्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी केली पाहिजे. असे आंतरराष्ट्रीय प्रश्न जेव्हा उद्भवतात त्यावेळेला प्रथम अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम झाला तरच त्याचा मोठा फरक जाणवतो. चीनच्या वस्तूंवर जो बहिष्कार घालण्यात येत आहे तो समर्थनार्थ आहे. परंतु, भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तू येतात त्याला पर्याय म्हणून भारतीय वस्तू उत्पादित होणे गरजेचे आहे. जेणेकरून लोकांची गरज भागेल, असे मत जयस्वाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.