मुंबई - पत्नीचा वर्षभरापूर्वी कोरोनाने मृत्यू झाल्याने नैराश्येतून 36 वर्षीय व्यक्तीने आपल्या 6 वर्षीय मुलीची हत्या करून आत्महत्या केली. ही घटना विलेपार्ले येथे घडली. जितेंद्र बेडकर, असे मृत व्यक्तीचे नाव असून अर्पिता, असे त्याच्या सहा वर्षीय मुलीचे नाव आहे.
हेही वाचा - 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित करण्याचा विचार- राजेश टोपे
जितेंद्रच्या पत्नीचा जून 2020 मध्ये कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने डिसेंबर महिन्यात दुसरे लग्न केले होते. अर्पिता ही त्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी होती. पत्नीच्या मृत्यूनंतर जितेंद्र मानसिक तणावात होता. विलेपार्ले येथे घर पाहण्यासाठी तो काल आला होता. त्यावेळी नैराश्येतून त्याने आधी मुलीची हत्या केली व नंतर स्वत: गळफास घेतला.
सुसाईड नोट मिळाली
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून, बेडकर याने नैराश्येतून हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. तसेच, मुलीला एकटे सोडू शकत नाही म्हणून तिलाही सोबत नेत असल्याचा उल्लेख केला आहे.
जितेंद्रला घरातले फोन करत होते. मात्र, तो फोन उचलत नसल्याने शेजारच्या व्यक्तींनी फोन केला. जितेंद्र घरातून प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांना बोलवून घराचा दरवाजा तोडला असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जितेंद्रच्या विरोधात हत्येचा व अपमृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - सुप्रीम कोर्टाला मुंबईची रियालिटी माहिती आहे का? मनसेचा सवाल