मुंबई - नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत 5.82 लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंप वीजबिलापोटी 511 कोटी 26 लाख रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली.
कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत 'महाकृषी ऊर्जा अभियान' राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या 511 कोटी 26 लाख रकमेवर 256 कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण 5 लाख 82 हजार 114 शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे.
30 हजार कोटींची सवलत
राज्यातील 44 लाख 44 हजार कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 789 कोटी रुपयांची थकबाकी आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणानुसार विलंब आकार आणि व्याजातील एकूण सूट 15 हजार 93 कोटी रुपये इतकी असून सुधारित होणारी थकबाकी 30 हजार 696 कोटी रुपये होते. पहिल्या वर्षी भरल्यास सुधारित मूळ थकबाकीपैकी अर्धी म्हणजेच सुमारे 15 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम माफ होणार आहेत. यातून 30 हजार कोटींची सवलत मिळणार आहे. त्यामुळे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
अशी झाली थकबाकी वसुली
पुणे - 201.20 कोटी
कोकण - 172.48 कोटी
नागपूर - 48.15 कोटी
औरंगाबाद - 89.44 कोटी
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ची तपास यंत्रणा तयार करावी - सचिन सावंत
हेही वाचा - पोलीस दलातील घडामोडींवर संजय राऊतांचे ट्विट, म्हणाले..