मुंबई- राज्यात कोरोना संक्रमणावर मात करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस खात्यातील ५६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मृत पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबाना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाला शासकीय निवास्थानात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात आतापर्यंत ४२८८ पोलीस कोरोना संक्रमित झाले आहेत. यातील तब्बल ३२३९ पोलीस हे उपचार घेऊन पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, राज्य पोलीस दलातील ५६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील सर्वाधिक ३७ पोलिसांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात सध्या १००७ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये १०९ पोलीस अधिकारी व ८९८ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात कलम १८८ नुसार १ लाख ३६ हजार गुन्हे नोंदविण्यात आले असून क्वारंटाईन मोडणाऱ्या ७४६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांवर हल्ला होण्याच्या २८३ घटना घडल्या असून यात आतापर्यंत ८५८ जणांना अटक पोलिसांनी केली आहे. कोरोनाच्या संदर्भात पोलीस नियंत्रण कक्षावर १ लाख ४ हजाराहून अधिक कॉल आले आहेत.
अनधिकृत वाहतूक प्रकरणी तब्बल १३३५ गुन्हे नोंदवून २७ हजार ७१७ जणांना अटक करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात पोलिसांनी तब्बल ८४८२१ वाहने जप्त केली असून आता पर्यंत ९ कोटी ९ लाख ५४ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. वैद्यकीय पथकावर ५३ ठिकाणी हल्ले झाले आहेत.