मुंबई Fake Visa Case : बनावट व्हिसानं सर्बिया देशात जाणाऱ्या पंजाबी नागरिकाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुरविंदर सिंग असं त्या बनावट व्हिसानं सर्बिया देशात जाणाऱ्या नागरिकाचं नाव आहे. गुरविंदर सिंग याला सर्बियातील इमिग्रेशन अधिकाऱ्यानं हद्दपार करत भारतात पाठवल्यानंतर सहार पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्बिया इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सोपवलं मुंबईतील अधिकाऱ्याकडं : कतार एअरलाइन्सच्या क्रूनं 27 नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता या घटनेची माहिती इमिग्रेशन अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे सर्बियन इमिग्रेशन अधिकाऱ्यानं गुरविंदर सिंगला हद्दपार केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर गुरविंदर सिंगला मुंबई इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडं सोपवण्यात आलं. मुंबई इमिग्रेशन अधिकाऱ्यानं गुरविंदर सिंगच्या हद्दपारीच्या नोटीसची तपासणी केल्यावर व्हिसा नसल्याचं उघड झालं. 4 ऑक्टोबर 2023 ला गुरविंदर सिंग दुबईला पर्यटक म्हणून गेला होता. तिथं तो एका एजंटसोबत आला होता. त्या एजंटनं त्याला 6 लाख भरुन युरोपला जाण्याची सोय करण्याची बतावणी केली. त्यानंतर गुरविंदर सिंग यानं ६ लाख भरण्याचं मान्य केलं. त्यानंतर त्या एजंटनं त्याच्या पासपोर्टवर सर्बियन व्हिसाची व्यवस्था केली, असं पोलीस चौकशीत उघड झाल्याचं सहार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दोहामार्गे कतार एअरलाइन्सनं सर्बियाला जाण्याचा प्रयत्न : गुरविंदर सिंग यानं 18 नोव्हेंबरला दुबईहून भारतात परतल्यानंतर 24 नोव्हेंबरला दोहामार्गे कतार एअरलाइन्सचा वापर करुन सर्बियाला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रूच्या लक्षात आल्यानंतर गुरुविंदरची चौकशी करण्यात आली. यावेळी सर्बियन इमिग्रेशन अधिकार्यांनी बनावट व्हिसाची पडताळणी केली. परिणामी गुरविंदर सिंगला भारतात हद्दपार करण्यात आलं.
सहार पोलिसांनी केला गुन्हा दाखल : सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं की, "आरोपी गुरविंदर सिंग याला अटक केली असून आज ( 29 नोव्हेंबर) न्यायालयात हजर केलं जाणार आहे. गुरविंदर सिंगनं त्याच्या भारतीय पासपोर्टमध्ये सर्बिया देशाचा बनावट व्हिसा खरा असल्याचं भासवलं. त्या व्हिसाच्या आधारे त्यानं 24 नोव्हेंबरला कतार एअरलाइन्सच्या विमानानं मुंबई ते सर्बिया असा प्रवास केला आहे. मात्र इमिग्रेशन ऑथॉरिटीनं त्याला प्रवेश नाकारुन परत मुंबईत पाठवलं आहे. तो 27 नोव्हेंबरला परत मुंबईत आला. अशा प्रकारे गुरविंदर सिंग या प्रवाशांनी बनावट व्हिसावर प्रवास करून मुंबई इमिग्रेशन ऑथोरिटीची फसवणूक केली आहे. म्हणून इमिग्रेशन विभागाच्या वतीनं गुरविंदर सिंग विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे सहार पोलिसांनी गुरविंदर सिंगवर भांदवी कलम 420, 465, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल केला" अशी माहिती सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी दिली.
हेही वाचा :