मुंबई - येथे स्वतःचे हक्काचे घर असावे, असे येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. मात्र, याचाच गैरफायदा घेत एक आरोपी बनावट कागदपत्रे बनवून लोकांना म्हाडाचे फ्लॅट विकत होता. या आरोपीला मुंबईच्या नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. कामरान अखतर हुसेन सैयद, असे या आरोपीचे नाव आहे.
कामरान हा म्हाडाच्या घरांची खोटी कागदपत्रे बनवून, खोटे अलॉटमेंट लेटर बनवून जेष्ठ नागरिकांना स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवत होता. आयुष्यभर काबाडकष्ट करून निवृत्तीनंतर आलेला पैसा, फंड, ग्रॅच्युटी यांचा वापर करून मुंबईसारख्या शहरात घर घेण्याचे स्वप्न पाहणारे जेष्ठ नागरिक या आरोपीच्या निशाण्यावर होते. आतापर्यंत या आरोपीने ४ लोकांना फसवले होते. त्याने या लोकांकडून प्रत्येकी ४० ते ४५ लाख रुपये लुबाडले आहेत. आरोपी कामरानसोबत या गुन्ह्यात आणखी किती लोकांचा समावेश आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.