मुंबई Mumbai Crime News : फसवणुकीच्या घटनांची माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पोलीस पथकाने मालेगाव, नाशिक येथे सापळा रचून गुन्हयातील मुख्य आरोपी मोहम्मद शेरु, शेख मकसूद खॉ उर्फ डॉ.आर पटेल (वय ४९ वर्षे), मोहम्मद नफीस, मोहम्मद शरीफ (वय ३९ वर्षे), मोहम्मद आसिफ, मोहम्मद निसार, (वय २७ वर्षे) आणि मोहम्मद अशिफ शरीफ (वय ४४ वर्षे) यांना शिताफीनं अटक केली आहे. हे सर्व आरोपी राजस्थान येथील राहणारे आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त राज टिलक रौशन यांनी दिली आहे.
अशी केली लोकांची फसवणूक : क्राईम ब्रँचकडे एक तक्रार आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक हा तक्रारदार आणि पीडित होता. त्यांची बोगस डॉक्टरांनी फसवणूक केली होती. या डॉक्टरांच्या गॅंगची मोडस ऑपरेंडी अशी होती की, सार्वजनिक ठिकाणी जाऊन विशेषतः हॉस्पिटल्स मध्ये किंवा वॉकिंगसाठी गार्डनमध्ये जाऊन अशा लोकांना शोधत होते. ज्यांना काही क्रॉनिक रोग आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सांगत होते की, त्यांच्याकडे एक पथक आहे. ते पथक क्रॉनिक आजारावर उपचार करतात आणि ते बरे होऊ शकतात. चार डॉक्टरांची टोळकी बनावट नाव धारण करून वावरत होती. घरी जाऊन पेशंटची बॉडी चेक करत होते. त्यानंतर त्यांची नस दबल्याचं सांगून त्यांच्या बॉडीवर मेटल कोण टाकून त्यामध्ये प्रेशर क्रिएट करून रक्त काढत होते. दरम्यान तोंडामध्ये मुलतानी माती ठेवल्याने पिवळसर रंगाचे दिसत होते. त्यानंतर ते पिवळसर रक्त दाखवून बतावणी करून फसवणूक करत होते. पीडित तक्रारदाराकडून 14 लाख रुपये या टोळक्याने उकळले आहेत.
गुन्हा केला दाखल: मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंड संविधान कलम ४२०, ३४ सह ३३, ३६ महाराष्ट्र वैदयक व्यवसायी अधिनियम १९६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची हकिकत अशी की, २६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरच्या कालावधीत तक्रारदार राजेश पाटील, वय ६१ वर्षे (बदलेले नाव) वडाळा, मुंबई हे नरीमन पॉईट, मुंबई येथे त्यांचे व्यावसायिक कामानिमित्त असताना, बनावट नावे धारण केलेले सर्व इसम यांचेकडे कोणताही अधिकृत वैदयकीय परवाना नसताना, तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सीलमध्ये त्यांची नोंदणी नसताना, संगणमताने तक्रारदार यांची फसवणूक केली.
आर्थिक फसवणूक : डॉक्टर आर. पटेल व त्याचे सहाय्यक यांनी तक्रारदार यांच्या वडाळायेथील घरी येवून, त्यांची तपासणी करुन पित्तामुळे त्यांच्या शरीरातील नसा दबल्याचं सांगून, त्यामुळेच तक्रारदार यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोन्ही बाजूस छिद्र असलेली मेटल क्युब (तुंबडी) तक्रारदार यांच्या दोन्ही हातास व पाठीला लावून, त्याद्वारे रक्त साठून झालेल्या व्रणावर ब्लेडने मार्किंग करुन तक्रारदार यांच्या शरीरातील सर्व पित्त शरीराबाहेर काढल्याचे भासवून, बनावट वैदयकिय उपचाराकरीता तक्रारदार यांच्याकडून रोख १४ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
हेही वाचा -