मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल, असे स्पष्टीकरण कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिले. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नसल्याचेही ते म्हणाले.
पुण्यात ७ फेब्रुवारीला पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाला होता. कथीत ऑडिओ क्लिप प्रकरणी राज्यमंत्री संजय राठोड गोत्यात आले आहेत. भाजपने याबाबत आक्रमक भूमिका घेत राठोड यांचा राजीनामा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून राठोड यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे, या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोना अपडेट : रुग्ण संख्येत वाढ; मंगळवारी 3663 नवीन रुग्ण, 39 मृत्यू
आज राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवून दिल्याच्या वावड्या उठल्या. याप्रकरणी कृषीमंत्री दादा भुसे यांना विचारणा केली असता, संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणात जी चौकशी होईल त्यातून सत्य बाहेर येईल. राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही, जी वस्तुस्थिती आहे ती चौकशीनंतर समोर येईल, असे कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले.
संजय राठोड नेमके आहेत करी कुठे?
पूजाचा 7 फेब्रुवारीला मृत्यू झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. या प्रकरणावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्यावरील आरोपही खोडून काढलेले नाहीत. त्यामुळे, राठोड यांच्या भोवतीचा संशय अधिकच वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांची गाडी (एम.एच 01 डी.पी 7585) मंत्रालयाच्या प्रांगणात उभी आहे. त्यामुळे, राठोड नेमके गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संजय राठोड यांच्या समर्थनार्थ दिग्रस येथे निषेध रॅलीचे आयोजन
पूजाच्या मृत्यू प्रकरणात बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर करून बंजारा समाजाची बदनामी होत आहे. त्या विरोधात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या महंतांनी बैठक घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच, समाजाची बदनामी थांबवावी, असे आवाहन करत, राठोड यांच्या समर्थनात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे बंजारा समाज समन्वय समितीच्या वतीने पोहरादेवी इथल्या सुनील महाराज व जिंतेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळ्या जवळून निषेध रॅली काढण्यात येणार आहे.
हेही वाचा - संजय राठोड प्रमुख मंत्री असल्याने हा विषय सरकारचा- संजय राऊत